जगातील सर्वच धर्मांमध्ये प्रतिकांना महत्त्वाचे स्थान आहे. ही प्रतिके मुर्ती, चंद्र-सुर्य, प्राणी, वृक्ष इत्यादी स्वरुपात पुजली जातात. हिंदू धर्मात तर असंख्य प्रतिके आहेत व प्रत्येक प्रतिकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य सुद्धा आहे. अशाच प्रतिकांपैकी एक म्हणजे ‘गजांत लक्ष्मी’ शिल्प. रायगड जिल्ह्यासहित कोकण व महाराष्ट्राच्या अनेक भागांत ही गंजात लक्ष्मी शिल्पे वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास मिळतात.

सर्वप्रथम गजांतलक्ष्मी ही संकल्पना काय आहे ते समजून घेऊ, फार पुर्वीपासून मानव समाजात संपत्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच संपत्तीसाठी अनेक युद्धे, संघर्ष झाली आजही ही परंपरा चालूच आहे मात्र परिमाणे बदलली आहेत. लक्ष्मी देवी ही संपत्ती व सुबत्ता हीचे प्रतिक म्हणुन ओळखले जाते मात्र लक्ष्मी चंचल असून तिची योग्य ती सेवा न केल्यास ती आपले घर सोडून निघून जाते असेही आपण ऐकले आहे. लक्ष्मी अर्थात संपत्ती स्थिर राहण्यासाठी पुर्वी गजांतलक्ष्मी शिल्पाचा वापर करण्यात येत असे. या शिल्पामध्ये मधोमध कमलपुष्पावर बसलेली लक्ष्मी व तिच्या उजच्या व डाव्या बाजुस दोन हत्तींचे शिल्प अशी ही मुर्तीची रचना असायची, तसेच गणपती, मृग व मयुर यांच्या प्रतिमासुद्धा या शिल्पावर कोरल्या जायच्या. गजांतलक्ष्मीची स्थापना सामान्यतः निवास्थाने, राजकिय स्थाने, धर्मस्थळे तथा धान्यकोठारे इत्यादी महत्त्वाच्या वास्तुंच्या आसपास केली जात असे.

गजांतलक्ष्मी ही संकल्पना सर्वप्रथम पुरांणातून उगम पावलेली असून विष्णूपुराणातील समुद्रमंथनातल्या मुळ कथेवरुन गंजातलक्ष्मी या संकल्पनेचा उगम झाल्याचे प्रघातित आहे. क्षीरसागराचे मंथन झाल्यावर लक्ष्मी हे रत्न बाहेर आले, त्यावेळी अष्टदिग्गजांनी आपल्या शुंडेत सुवर्णपात्रे धरुन पवित्र जलाने तिच्यावर अभिषेक केला असे वर्णन विष्णूपुराणात आढळून येते. महाभारतामध्ये सुद्धा एक गंजातलक्ष्मीसंदर्भत एक अख्यायिका सांगितली जाते की, कौरवांनी पांडवांचे राज्य हिरावल्यानंतर हे राज्य परत मिळवण्यावर उपाय म्हणुन कृष्णाकडे विचारणा केली असता कृष्णाने भिमास गजांतलक्ष्मीची स्थापना करण्याचे सुचविले यावर भिमाने गजांतलक्ष्मी कुठे मिळेल हा प्रश्न विचारल्यवर स्वयं इद्राचा ऐरावत हाच गजांतलक्ष्मीचे प्रतिक असल्याचे कृष्णाने सांगितले तेव्हा भिमाने इंद्राकडे जाऊन ऐरावताची मागणी केल्यावर इंद्राने कृष्णास अशी अट घातली की हा हत्ती तु उचलू शकलास तरच तुला तो येथून घेऊन जाता येईल. बलवान भिमाने ऐरावतास उचलले व आपल्या निवास्थानी आणले व अशारितीने गजांतलक्ष्मीची स्थापना करुन पांडवांनी आपले गेलेले राज्य परत मिळवले अर्थात त्यासाठी त्यांना महाभारतासारखे युद्ध सुद्धा करावेच लागले हे सुद्धा सत्य आहे.

गंजातलक्ष्मी साक्षात सर्वसंपन्नतेचे प्रतिक असल्याने भारतात अनेक ठिकाणी ही शिल्पे आढळुन येतात. यामध्ये वेरुळची लेणी तसेच भारहुत, सांची, बोधगया व अमरावती इत्यादी लेण्यांत तसेच इ.स.६ व्या शतकातल्या एका ताम्रपटावर गजलक्ष्मीच्या प्रतिमा आढळून आल्या आहेत. कळचुरी राजवंशापर्यंत चालू असलेल्या काही नाण्यांवर सुद्धा गजांतलक्ष्मीचे चित्र असल्याचे आढळुन आले आहे.

रायगड जिल्ह्यात आढळून येणारी गजांतलक्ष्मी शिल्पे ही मुळतः शिलाहारकालिन तथा यादवकालीन असावीत कारण देवगिरीच्या रामचंद्र यादवांचे पंतप्रधान हेमाद्री हे आपल्या ग्रंथात “पद्मस्था पद्महस्ताच राजोल्पिप्रघटलुप्ता” असे गजांतलक्ष्मीचे वर्णन करतात. रायगड जिल्ह्यात ही शिल्पे प्रामुख्याने अलिबाग तालुक्यात वरसोली, आक्षी, आवास, सुधागड इत्यादी ठिकाणी अशा वास्तुंच्या परिसरात आढळून येतात ज्या शिलाहार अथवा यादवकालीन आहेत. गजलक्ष्मीचे शिल्प बसवण्याची परंपरा महाराष्ट्रात वेरुळच्या लेंण्यापासून सुरु झाल्याचे अनेक तज्ञ मानतात कारण वास्तुशास्त्र तथा शिल्पशास्त्र हे सुद्धा एका सांस्कृतीक वैभवाचेच प्रतिक असल्याने हे वैभव शाबुत रहावे यासाठी गजांतलक्ष्मीच्या शिल्पाची स्थापना करण्याची परंपरा सुरु झाली असावी.

रायगड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी गजांतलक्ष्मीची शिल्पे आढळून येतात, अलिबाग तालुक्यातल्या वरसोली येथील बेलेश्वर शिवमंदीराच्या बाहेरच एक गजांतलक्ष्मी पहावयास मिळते. याशिवाय अलिबाग तालुक्यातल्या आवास येथील वक्रतुंड गणेश मंदीराच्या आवारात एक सुस्थितीतले गजांतलक्ष्मी शिल्प पहावयास मिळते. तिसरे शिल्प हे आक्षी या गावात प्रसिद्ध अशा काळंबादेवीच्या मंदीरासमोर भुमीतून अवतिर्ण झाले होते व सध्या या मुर्तीची प्रतिष्ठापना काळंबादेवीच्या मंदिराच्या बाजुस एक छोटे मंदिर बांधून करण्यात आली आहे. याशिवाय सुधागड तालुक्यातल्या सुधागड या किल्ल्यावरही गजांतलक्ष्मीचे एक शिल्प आढळुन येते.

रायगड जिल्ह्यातली ही गजांतलक्ष्मी शिल्पे केवळ धार्मिक प्रतिके नसून आपल्या पुर्वजांच्या शिल्पशास्त्राचा एक उत्तम नमुना आहेत. शिल्पशास्त्राचे आधुनिकीकरण झालेले नसतानाही त्याकाळी इतक्या रेखीव रचना तयार करणे हे केवळ अद्वितिय प्रकारात मोडणारे कार्य आहे. पुरातन काळी मुद्रा तथा दाग दागिने यांच्याबरोबरच शिल्पे, आयुधे, प्राणिसंपदा, अन्नधान्य अशा सर्वच गोष्टींना संपत्तीतलाच एक महत्त्वपुर्ण भाग मानला जात असे. ज्या राज्यात जास्तित जास्त पुरातन वास्तू ते राज्य जास्त वैभवशाली असा हा निकष असे. कारण धन व जडजवाहिर या नष्टप्राय वस्तू असून शिल्पकामाने युक्त अशा वास्तू व मुर्त्या या चिरंतन टिकणार्‍या असतात म्हणुन गजांतलक्ष्मीचे महत्त्व वर्षानुवर्षे अबाधित राहीले. संपत्ती व सुबत्ता टिकवण्यासाठी तयार करण्यात आलेले गजांतलक्ष्मी शिल्प हे सुद्धा खर्‍या अर्थी आपल्या पुर्वजांनी आपल्या भावी पिढ्यांच्या उत्कर्षासाठी जतन करुन ठेवलेली संपत्तीच आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही व प्रचंड मेहनत घेऊन आपल्या पुर्वजांनी तयार केलेला हा वारसा जतन करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे.

  • सिद्धार्थ सोष्टे