रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे विद्यमान ठिकाण असलेले अलिबाग हे निसर्गसंपन्नतेसोबत पराक्रमाचा वारसा जपणारे शहर आहे. हे ठिकाण पुर्वीच्या चौल बेटावरील साखर या नावाने प्रसिद्ध असलेल्या खाडीच्या मुखावर वसले असून पुर्वी विलग असलेली ही बेटे आधुनिक युगात रस्ते व पुलांनी जोडली गेल्याने जवळ आली आहेत. खुद्द अलिबागला प्राचिन इतिहास नाही मात्र हा परिसर चौल या बंदरामुळे प्राचिन काळापासून प्रसिद्ध होता. अलिबाग हे नाव १७ व्या शतकात उदयास आले, पुर्वी या परिसराचे मुख्य गाव रामनाथ होते कारण गावात असलेले पुरातन राम मंदीर. या शिवाय गावठाण असल्यामुळे गावदेवी मंदीर ही रामनाथ येथेच आहे. त्याकाळी अलिबाग ही फक्त एक बाग होती जी कुणा “अली” नावाच्या धनिक व्यापार्‍याची होती, याच नावावरुन या बागेस “अलिबाग” असे नाव मिळाले. सध्याचे अलिबाग शहर हे अशा अनेक बागा व वाड्या मिळून तयार झाले आहे ज्यामध्ये श्रीबाग, हिराबाग, मोतीबाग इत्यादी अनेक बागांचा समावेश होतो. अलिबागचा उत्कर्ष प्रामुख्याने सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात झाला, अलिबाग या बागेचे रुपांतर त्यांनी संपन्न अशा शहरात केले, आंग्रेकाळात येथे अनेक विकास कामे व बांधकामे झाली तसेच मंदीरांची निर्मिती व जुन्या मंदीरांच्या जिर्णोद्धाराचे कार्यही झाले. या मंदिरांत मारुती मंदीर, बालाजी मंदीर, राममंदीर, काशिविश्वेश्वर मंदीर, गणपती मंदीर, काळंबिका मंदीर, विठ्ठल रखुमाई मंदीर, दत्तमंदीर, विष्णू मंदीर इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय शहरात दोन मशिदीआहे, ज्यातली एक २०० वर्षे जुनी असून एक १०० वर्षे जुनी आहे. अलिबागेत बेने इस्त्रायली लोकांची संख्या खुप मोठी आहे. यांचे एक सिनेगॉगसुद्धा येथे पहावयास मिळते. खुद्द अलिबागेत दोन किल्ले आहेत, एक म्हणजे प्रसिद्ध कुलाबा किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला व दुसरा हिराकोट किल्ला जो कान्होजी आंग्रे यांनी बांधला. अली याने बागायतीला पाणी मिळावे यासाठी अनेक विहीरी या बागेत बांधल्या. त्यातल्या ११-१२ विहीरी आजही अस्तित्वात आहेत. सन १६९८ मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे आरमार प्रमुख झाल्यावर त्यांनी अलिबाग शहराची निर्मिती केली, मात्र त्यांचा निवास कुलाबा किल्ल्यातच होता. मात्र राजवाडा, पागा व खजिन्यासाठी त्यांनी अलिबागची निवड केली. १८३९ साली कुलाबा संस्थान

   

खालसा झाले व तेथे इंग्रजांचा अंमल सुरु झाला. १८४० साली अलिबागला कुलाबा एजन्सीचे मुख्यालय करण्यात आले व १८५२ साली ते तालुक्याचे ठिकाण झाले. सन १८६९ साली निर्माण झालेल्या कुलाबा जिल्ह्याचे मुख्यालय म्हणूनही अलिबागचीच निवड करण्यात आली व कुलाबा जिल्ह्याचे “रायगड” नामांतर झाल्यावरही मुख्यालय अलिबागच राहीले. अलिबाग शहराची प्रमुख आकर्षणे आहेत. त्यामध्ये कुलाबा किल्ला, हिराकोट किल्ला, आंग्रेवाडा, छत्रीबाग, चुंबकिय वेधशाळा इत्यादींचा समावेध होतो. कुलाबा किल्ल्याची निर्मिती १६६२ सालि छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. यानंतर दर्यासारंग व दौलतखान यांनी येथून कारभार पाहिला व नंतर सरखेल कान्होजी आंग्रे यांनी कुलाब्यास आपल्या प्रमुख हालचालींचे ठिकाण केले. शहरातील प्रसिद्ध हिराकोट किल्ला व तलाव १७२० साली सरखेल कान्होजी आंग्र्यांनी खजिन्याच्या ठिकाणासाठी बांधला. येथे हिरा नामक एका स्त्रीची बाग होती. हा किल्ला बांधण्यासाठी जेथे खोदकाम करण्यात आले तेथेच नंतर तलाव बांधण्यात आला. या किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून वापरण्यात आलेले पाषाण प्रशस्त आहेत. किल्ल्यात देवीचे मंदीर असून बाहेर मारुती मंदीर व एक छोटा दर्गा आहे. सध्या याचा वापर तुरुंग म्हणून केला जातो. येथील छत्रीबागेत कान्होजी आंग्र्यांसहित घराण्यातील पुरुषांच्या व स्त्रीयांच्या समाध्याआहेत. बसस्थानकावरुन थोड्याच अंतरावर जुन्या धाटणीचा आंग्रेवाडा आहे, आजही या वाड्याने आपले भव्यपण जपले आहे. येथे पुर्वी आंग्रेकालीन टाकसाळ होती व त्यास ‘अलिबागी रुपया’ असे नाव होते.
येथील चुंबकिय वेधशाळा विज्ञानाचा अजब नमुना आहे, १९०४ साली स्थापन झालेल्या या वेधशाळेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. पृथ्वीच्या चुंबकिय शक्तीमधले फेरफार या शाळेत नोंद केले जातात. यासाठी इमारतीची बांधणी विशिष्ट अशा दगडांनी केली असून लोखंडाचा बिलकुल वापर करण्यात आलेला नाही. अलिबागेस नैसर्गिक व ऐतिहासिक पार्श्वभुमी आहेच मात्र याभुमीने अनेक नररत्नांची निर्मितीसुद्धा केली आहे. यामध्ये सरखेल कान्होजीआंग्रे, जनरल अरुणकुमार वैद्य यासारख्याअनेकांचा समावेश होतो.